www.24taas.com, जालना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जालन्यात जाहीर सभा होतेय. अहमदनगरमध्ये राज यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक, त्यानंतर राज्यात मनसे आणि राष्ट्रवादीमधला रस्त्यावर आलेला संघर्ष यावर राज काय भाष्य करतात याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांच्यावर केलेल्या टीकेचा राज कसा समाचार घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवाय अहमदनगरच्या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राज यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्यावरही राज तोफ धडाडणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. तसंच दगडफेकीच्या घटनेनंतर राज यांनी पोलिसांनाही लक्ष्य केलं होतं. याबाबत ते काय भूमिका मांडतात हे पाहावं लागेल. विशेष म्हणजे जालन्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. जालन्यात दुष्काळाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. कृषीमंत्री शरद पवारांनीही जालन्याचा दौरा केला होता. त्यामुळं दुष्काळाच्या मुद्यावर राज काय बोलणार का? याकडंही राजकीय विश्लेषकांसह साऱ्यांचं लक्ष लागलंय.
जालन्यात होणाऱ्या राज यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. अहमदनगर दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, १०० पोलीस अधिकारी, एक हजार पोलीस कॉन्स्टेबल, बॉम्ब स्कॉड पथक असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.