www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातून विविध सामाजिक समस्या चव्हाट्यावर मांडतोय. मात्र सोशल मीडियाचा गैरवापर करून, आमीर खान विरोधात बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर पसरवला जात आहे.
सोशल मीडियावरील समाजकंटकांच्या या कारवायांविरोधात त्याने मुंबईच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि सहआयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन त्याने बदनामी करणार्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केलीय.
आमीर खानला टीव्ही शोमधून मिळणारी रक्कम आणि देणग्या मशिदीच्या बांधकामासाठी आणि मुस्लीम तरुणांना नोकरी मिळणे, उद्योगासाठी वापर केला जातो, असा अपप्रचार फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवरून करण्यात येत असल्याचा खोटा आरोप त्याच्यावर होतोय.
हा प्रकार धादांत खोटा आणि मनाला वेदना देणारा असल्याचे आमीरने स्पष्ट केलं आहे. देशभरातील सामाजिक, वैद्यकीय, महिलांवरील अत्याचार, विविध क्षेत्रांतील भ्रष्टाचाराबाबत `सत्यमेव जयते` या टीव्ही शोद्वारे वाचा फोडली आहे.
दुसर्या टप्प्यातील ही मालिका २ मार्चपासून सुरू झाली आहे. त्याला देशभरातून प्रतिसाद मिळत असल्याने काही विघ्नसंतुष्टांकडून फेसबुकवरून त्याच्याविरुद्ध जातीय स्वरूपाचा अपप्रचार केला जात आहे.
हैराण झालेल्या आमीरने शनिवारी महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्यानंतर, मुंबईचे पोलीस आयुक्त मारिया आणि दाते यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.