मुंबई : फिरकीचा जादूगर आणि जंबोच्या नावाने प्रसिद्ध अनिल कुंबळे भारताच्या प्रमुख प्रशिक्षकपदी विराजमान झाले आहेत. ५६ जणांना क्लीन बोल्ड करत कुंबळेंनी हे पद मिळवलं आहे. रवि शास्त्री हे त्यांचे मुख्य प्रतिद्वंद्वी होते. आम्ही तुम्हाला अशी ५ कारणं सांगणार आहोत ज्यामुळे कुंबळे भारताच्या कोचसाठी निवडले गेले.
५ कारणांमुळे कुंबळे बनले कोच
१. नम्र स्वभाव
अनिल कुंबळे चांगल्या बॉलिंगसाठी जेवढे जाणले जातात तेवढेच ते चांगल्या स्वभावासाठीही ओळखले जातात. क्रिकेटचा जेंटलमॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. ऑस्ट्रेलियामध्ये २००८ मध्ये झालेल्या विवादात कुंबळेचा व्यवहार प्रशंसनिय होता.
२. सचिन, गांगुली लक्ष्मणची मिळाली साथ
माजी कर्णधार अनिल कुंबळेला सचिन तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मणची ही साथ मिळाली. तिघांच्या सल्लागार समितीने कुंबळेंना ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. हे तिघेही कुंबळेसोबत खेळले आहेत. त्यामुळे त्यांना कुंबळेचं महत्त्व निश्चितच माहित आहे. कुंबळेकडे टीमला एकत्र ठेवण्याचं चांगलं कौशल्य आहे.
३. युवा खेळाडू
कुंबळे हे कोचच्या स्पर्धेत असणाऱ्या इतर प्रतिस्पर्धिंच्या तुलनेत वयाने युवा आहेत. टीम इंडियामध्ये वर्तमानात खेळणारे अनेक खेळाडू कुंबळेसोबत खेळले आहेत. कुंबळेंसोबत अनेकाचं चांगलं जमतं त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या फेव्हरमध्ये अधिक होती. कुंबळेनंतरच धोनीला कर्णधार करण्यात आलं होतं.
४. जबरदस्त अनुभव
भारताकडून खेळतांना सर्वाधिक विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुथैया मुरलीधरन आणि शेन वार्न नंतर कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे. कुंबळेचा हा रेकॉर्ड त्यांच्या पक्षात होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना कोचिंगचा अनुभव नसला तरी ते आयपीएलमध्ये मुंबई आणि बंगळुरु टीमचे मेंटर राहिले आहेत. कुंबळे हे एक मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.
५. रवि शास्त्रींना जबाबदारी न देणं
बीसीसीआयला हे पद रवी शास्त्रींना द्यायचं नव्हतं अशा ही चर्चा होत्या. त्यामुळे शास्त्रींनंतर कुंबळेच या पदासाठी प्रबळ दावेदार होते. कुंबळे हे कोचिंगच्या क्षेत्रात नवे आहेत त्यामुळे कुंबळे काहीतरी नवीन करतील अशी बीसीसीआयला अपेक्षा आहे.