मेलबर्न : ख्रिस गेलनं शनिवारी बिग बॅश लीगमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये ६०० चौकारांसोबतच ६०० षटकारांचा पल्ला गाठलाय.
आयपीएलचे, बिग बॅश लीगचे अनेक सामने धडाकेबाज गेलनं गाजवलेत. टी-२० मध्ये त्यानं ६०० चौकारांचा टप्पा आधीच ओलांडला होता. त्यानंतर काल मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं दोन उत्तुंग षटकार ठोकून ६०० षटकारांची वेसही ओलांडली.
विंडीजचा तगडा क्रिकेटवीर ख्रिस गेल हे टी-२० क्रिकेटमधील वादळ आहे. तो पीचवर टिकला, त्याची बॅट लागली की हा 'रावण' प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः पालापाचोळा करून टाकतो. ख्रिसला बुकी लोकांनी रावण नाव दिलं आहे, ख्रिस मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी होते.
टी-२० मधील षटकारांची संख्या मोजायची तर ख्रिस गेल आधीच कुठच्या कुठे होता. आता ६०० षटकारांचा पल्ला गाठल्यावर त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विंडीजचाच किरॉन पोलार्ड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या खात्यात ३८८ षटकार आहेत. ब्रॅण्डन मॅकलम २९० षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
कालच्या सामन्यातील दोन चौकार धरून ख्रिस गेलनं टी-२० मध्ये ६५३ चौकार हाणलेत. ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉज त्याच्यापासून थोड्याच अंतरावर आहे. त्यानं ६६४ वेळा चेंडू सीमारेषेपार धाडलाय, तर मॅकलमनं ६०५ चौकार लगावलेत.
ख्रिस गेलच्या नावावर टी-२० मधील वेगवान शतकाचा विक्रमही जमा आहे. २०१३च्या आयपीएल स्पर्धेत आरसीबीकडून खेळताना त्यानं ३० चेंडूत शतक झळकावलं होतं.