नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरच्या नावाची क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीये.
तब्बल ५२ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये खेळणारी २३ वर्षीय दीपा पहिली खेळाडू ठरली. तसेच रिओमध्ये फायनलसाठी पात्र ठरणारी पहिली जिम्नॅस्ट ठरली. अंतिम फेरीत दीपाला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. काही गुणांसाठी तिचे पदक हुकले. मात्र तिच्या खेळाने तिने देशवासियांची मने जिंकून घेतली.
भारताचा स्टार नेमबाज जितू रायचीही या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीये. ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात जितूने फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये त्याला ८व्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलरत्नच्या शर्यतीत आशियाई रौप्य पदक विजेती टिंटू लुकाचाही समावेश आहे.
भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला यंदाच्या वर्षीचा अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे. यंदा अर्जुन पुरस्कार मिळवणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच व्ही.आर. रघुनाथ, बॉक्सर शिवा थापा, स्टीपलचेसपटू ललिता बाबर यांच्या नावांचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीये.