कोलकाता : तब्बल दोन वर्षांनी टीम इंडियामध्ये कमबॅक करणारा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं आपल्या कमबॅकला आपल्या मेहनतीचं फळ म्हटलंय. तसंच आपल्या कठीण काळात कधीच आशा सोडली नव्हती असंही तो म्हणाला. बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यासाठी निवड झाल्यानंतर तो म्हणाला की, जेव्हा संघाबाहेर गेलो होतो तेव्हा मी कधीच निराश झालो नव्हतो. मला आशा होती की चांगले प्रयत्न केल्यास मी पुन्हा संघात येऊ शकेन. मी माझ्या फिटनेसवर विशेष काळजी घेतली आणि आशा सोडली नाही. कठीण काळातही माझी देवावरील श्रद्धा कमी झाली नाही.
संघामधील स्वत:च्या स्थितीबद्दल बोलताना संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू म्हणाला की, जेव्हा मी अनिल कुंबळे, झहीर खान सोबत खेळत होतो आणि आता अश्विन, शर्मा सारख्या नवीन खेळाडूंसह खेळणार आहे. पण माझ्या डोक्यात नेहमी एकच विचार असतो तो म्हणजे विजयाचा. मी माझ्या अनुभवाचा फायदा नवीन खेळाडूंना करून देईन, ज्यानं त्यांचं करिअर चांगलं होईल.
दुसरीकडे त्यांना संघाबाहेर गेलेल्या गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह बद्दल विचारल्यावर हरभजन म्हणाला की ते सारे चॅंम्पियन खेळाडू आहेत आणि परतीच्या आशेवर आहेत.
कोलकातामधून ढाक्यासाठी रवाना झालेल्या भज्जीनं म्हटलंय की अजून दोन प्रकारांमध्ये कमबॅक करणं त्याचं पुढील लक्ष्य असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.