नवी दिल्ली : रवीद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यासमोर भारताविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी द. आफ्रिकेचा पहिला डाव १२१ धावांत संपुष्टात आला. रविंद्र जडेजाने सर्वाधिक पाच बळी मिळवताना आफ्रिकेचा डाव झटपट गुंडाळण्यात मोलाचे योगदान दिले. त्याला उमेश यादव आणि आर. अश्विन (प्रत्येकी दोन) यांनी त्याला चांगली साथ दिली.
आफ्रिकेकडून एबी डेविलयर्सने सर्वाधिक ४२ धावा केल्या. मात्र आफ्रिकेचे इतर फलंदाज साफ अपयशी ठरल्याने त्यांना केवळ १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. हाशिम अमला, फाफ डु प्लेसिस, जेपी ड्युमिनीसारखे भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतले. भारताने दुसऱ्या डावात २१३ धावांची आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी, भारताने पहिल्या दिवसअखेर सात बाद २३१वरुन खेळताना दुसऱ्या दिवशी १०३ धावा जोडल्या. अजिंक्य रहाणेचे दमदार शतक आणि त्याला आर. अश्विनची लाभलेली चांगली साथ यामुळे भारताला पहिल्या डावात तीनशेपार धावा करता आल्या.
मुंबईकर अजिंक्य रहाणेनेे १२७ धावांची शानदार खेळी साकारली. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पाचवे शतक आहे. अजिंक्यपाठोपाठ फिरकीपटू आर. अश्विनने ५६ धावांची खेळी करताना संघाला तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला. रहाणे आणि अश्विन यांनी आठव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी रहाणेने जडेजासह ५९ धावा जोडल्या होत्या.
पाहा लाइव्ह स्कोअरकार्ड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.