मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतलीये.
या सामन्यात विराट आणि कंपनीने इंग्लंड संघाला भारताचा एक डाव आणि 36 डावांनी विजय अशी धूळ चारली. वानखेडेच्या मैदानावर मुंबईकरांच्या साक्षीने भारतीय संघाने विजयाला गवसणी घातली.
कर्णधार विराट कोहली, सलामीवीर मुरली विजय, जयंत यादवची दमदार फलंदाजी तर दुसरीकडे आर. अश्विन, रवींद्र जडेजाचा भेदक मारा यांच्या जोरावर भारतीय संघाने हा विजय मिळवला.
इंग्लंडने टॉस जिंकताना पहिल्या डावात 400 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने 631 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावास सुरुवात केली. मात्र त्यांचा संपूर्ण डाव 195 धावांवर आटोपला आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.
आर. अश्विनने संपूर्ण सामन्यात 12 बळी मिळवले. तर कर्णधार कोहलीनेही या सामन्यात द्विशतक झळकावले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताने या सामन्यात चांगली कामगिरी केली.