अखिलेश हळवे, नागपूर : दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर देशात एकूण महिलांमध्ये सुरक्षेबाबत काळजीचं वातावरण होतं. त्यानंतर कित्येक ठिकाणी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले. पण नागपूरात एक संस्था अशी आहे जी गेली काही वर्ष महिलांना स्वसंरक्षणचे धडे तर देतेच आहे, पण त्यांना देशाचं नाव उंचावण्यासाठीही प्रशिक्षण देतेय.
केतकी गोरे किंवा इशिता कापटा यांच्यासारख्या मुलींना पाहिल्यावर ज्युडोमध्ये भारताचं भवितव्य चांगलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. नागपूरच्या हनुमान नगरमधल्या 'द ज्युडो असोसिएशन, नागपूर' या केंद्रात त्या प्रशिक्षण घेतायत. या केंद्रात 30 हून अधिक वर्षांपासून ज्युडोचं प्रशिक्षण दिलं जातंय.
आजवर या केंद्रातल्या खेळाडुंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलंय. आता यात खेळाडुंमध्ये समावेश झालाय तो केतकी आणि इशिताचा. 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान पाटणा, बिहारमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत केतकीनं सुवर्णपदक पटकावलं. तर बंगळुरूमध्ये झालेल्या CBSE शाळांच्या स्पर्धेत इथितानं सुवर्णपदकाची कमाई केलीय.
या क्रीडा प्रकाराचं आकर्षण असलं तरी आत्मरक्षणासाठीही हा खेळ तितकाच महत्त्वाचा... भविष्यात कुठल्याही संकटाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळंच ज्युडोचं प्रशिक्षण घेत आहे, असं राष्ट्रीय स्तरावरील ज्युडोपटू शुभांगी राऊत यांचं म्हणणं आहे. प्रशिक्षण घ्यायची मेहनत करायची आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकायचं असंही इथल्या खेळाडुंचं स्वप्न आहे.
या खेळाडुंना आता उत्तम सुविधा मिळाल्या तर देशालाही त्याचा निश्चितच फायदा होईल. कारण आजवर या केंद्रानं पदकप्राप्त खेऴाडू देशाला दिलेत. या केंद्रात येणारे अनेक खेळाडू आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातून येतात. त्यामुळं त्यांना या सुविधांची गरज आहे, असं ज्युडो तज्ज्ञ पुरुषोत्तम चौधरी यांनी म्हटलंय. समाज आणि शासकीय स्तरावर साथ मिळाली तर या केंद्रातले खेळाडू देशाचं नाव उज्ज्वल करतील यात शंकाच नाही.