बंगळुरु : मुंबईचा संघ म्हटले की त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या संघाला धडकी बसते. मात्र, या मुंबई रणजी संघाला बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर स्वत:ची इज्जत राखण्यास अपयश आलेय. केवळ ४४ रन्समध्ये अख्खा संघ गारद झाला. ही कमाल करुन दाखवली ती कर्नाटक संघाने.
४० वेळा रणजी करंडक जिंकणार्या मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याने त्यांचा पहिल्या डावात सर्व बाद ४४ असा खुर्दा उडाला. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (६१ रन्स, ४ विकेट) याच्या अफलातून कामगिरीमुळे गतविजेत्या यजमान कर्नाटकचा पहिला डाव आज ६०.२ ओव्हर २०२ रन्सवर आटोपला. मात्र त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबई संघाला चांगला खेळ करता आला नाही.
कर्नाटकचा कर्णधार आर. विनयकुमारने २० रन्समध्ये ६ विकेट घेतल्या. विनयकुमारने मुंबईच्या इज्जतीचा चोळामोळा केला. त्यानंतर कर्नाटकची दुसर्या डावात २ बाद १० अशी घसरगुंडी झाली. कर्नाटकच्या पहिल्या डावातील २०२ या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना मुंबईचा पहिला डाव १५.३ षटकांत ४४ रन्सवर आटोपला.
मुंबईचे ५ फलंदाज शून्यावर बाद झाले. आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही तर प्रमुख फलंदाज अभिषेक नायर दुखापतीमुळे फलंदाजीला उतरू शकला नाही. पहिल्या दिवसभरात दोन्ही संघांचे मिळून २२ फलंदाज बाद झाले. दिवसअखेर यजमान कर्नाटकने १६८ रन्सची आघाडी मिळवली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.