नवी दिल्ली : आशिया कपच्या फायनलमध्ये ६ चेंडूत २० धावा करुन फिनिशर हे बिरुद पुन्हा मिळवणाऱ्या वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे सर्वत्र कौतुक होतेय. मात्र धोनीच्या या खेळीचे श्रेय हरभजन सिंगला जाते. मंगळवारी हरभजनने या गोष्टीचा खुलासा केला की धोनीला चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्याची आयडिया त्याची होती.
जेव्हा धोनी फलंदाजीस आला तेव्हा भारताला १४ चेंडूत २२ धावांची गरज होती. धोनीने आपल्या शैलीत जबरदस्त खेळ करताना सात चेंडू राखून विजय मिळवला.
तिसरा फलंदाज बाद झाल्यावर फलंदाजीस कोणाला पाठवावे याबद्दल धोनीने विचारले असता, हार्दिक पंड्याला पाठवावे का? तेव्हा मी म्हणालो, नाही तु जगातील बेस्ट फिनिशर आहेस. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी जावे असे वाटते, असे हरभजन म्हणाला.
या काही लहान मोठ्या गोष्टी आहेत ज्या मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चेत बोलतो, असेही पुढे हरभजन म्हणाला. भले सध्या जरी गोलंदाजीत हरभजनला संधी मिळत नसली तरी मात्र त्याच्या आयडियाने त्याला सुपरहिट बनवलेय.