मुंबई: भारतामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण या वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढतच चालल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर शेन वॉटसनच्या पोटाला दुखापत झाली आहे. वॉटसन हा सध्या सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लिगमध्ये इस्लामाबादच्या टीमकडून खेळत होता. पण यावेळी त्याच्या पोटाला दुखापत झाली.
या दुखापतीमुळे वॉटसन पाकिस्तान सुपर लिग अर्धवट सोडून पुढच्या उपचारांसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगमधल्या उरलेल्या मॅचही वॉटसन खेळू शकणार नाही.
टी-20 वर्ल्ड कप आधी आपण फिट होऊ अशी अपेक्षा वॉटसननं व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये असलेले ऍरोन फिंच आणि स्टिव्ह फॉकनरही दुखापतीतून बाहेर येत आहेत, तर फास्ट बॉलर कोल्टर-नाईलही खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यात आता वॉटसनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.