www.24taas.com, मुंबई
प्राध्यापकांच्या 72 दिवसापासून सुरु असलेल्या बहिष्कार आंदोलनात विद्यापीठानं सरकारच्या आदेशानुसार परीक्षा तर घेतल्या पण, त्यात विद्यार्थ्यांचेच हाल झाले. त्यातच आता विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे टीवाय बीकॉमच्या मार्केटींग अँड ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट या पेपरच्या नमुना उत्तर पत्रिकेतलंचं उत्तर चुकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्न क्रमांक दोन सीमधिल 7 मार्काचं उत्तर हे तपासणीसाठी काढण्यात येणा-या नमुना उत्तर पत्रिकेत चुकीच असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर संबंधित परीक्षकांनी 10 तारखेला प्राचार्यांना कळवलं. त्यानंतर 11 तारखेच्या दुपारनंतर नवीन नमुना उत्तरपत्रिका संबंधित परीक्षा तपासणी केंद्रांवर पाठवण्यात आल्याची माहिती मिळतेय. मात्र, त्यावेळेत चुकीच्या उत्तरानुसार पेपर तपासण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं गुण देण्यात आले असतील यावर प्रश्नचिन्ह आहेच. टीवाय बीकॉमला यावर्षी 85 हजार विद्यार्थी परीक्षेला होते.
मात्र, प्राध्यापक संपावर असताना आधीच आवश्यक अनुभव नसलेल्या प्राध्यापकांकडून पेपर तपासण्याचं काम सुरु असल्यानं वर्षभर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला मात्र तपासणीच चुकीच्या उत्तरांवर होत असेल तर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही का? याबाबत विद्यापीठाकडून पेपर पुन्हा तपासणीसाठी देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.