अजित पवार यांचा काँग्रेसला टोला
www.24taas.com, नवी मुंबई
जलसिंचनाबाबत माझ्यावर झालेल्या आरोपांची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कुणाच्या दबावाला झुकून मी राजीनामा दिला नसून भ्रष्टाचाराच्या कुंडात माझा बळीही गेलेला नाही. माझा बळी घेणारा अजूनपर्यंत पैदा झालेला नाही, असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे काँग्रेसवर साधला.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून एमआयडीसीतील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण आणि ठाणे-बेलापूर सर्व्हिस रोडच्या कामाचा शुभारंभ आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, देश पातळीवर भ्रष्टाचाराचे दररोज वेगवेगळे प्रकरणे बाहेर येत असून राज्य पातळीवर आरोप-प्रत्यारोपांचे युध्द सुरू आहे. हे असेच घडत राहिले तर सामन्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वा्स उडेल आणि अराजक माजायला वेळ लागणार नाही.
नवी मुंबई महापालिकेत उपमहापौरांना मिळालेल्या चप्पल प्रसादावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महापौर सागर नाईक, खासदार संजीव नाईक, आमदार नरेंद्र पाटील, महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.