www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्याच्या उपमहापौरपदी भाजपाच्या मुकेश मोकाशी यांची बिनविरोध निवड झालीय. मिलिंद पाटणकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारणात हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यानं आघाडीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या बहिष्कारानंततर मोकाशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची निवड बिनविरोध झालीय.
२३ डिसेंबर रोजी परिवहन समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे सदस्य शैलेश भगत यांनी बंडखोरी करत अर्ज भरला होता. त्यावेळी भाजपचे अजय जोशी यांनी भगत यांना मतदान केल्याने ही समिती युतीच्या हातून निसटली होती. जोशी यांच्या फुटीला भाजपचे तत्कालीन उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची फूस असल्याचा आरोप करत शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर पाटणकर यांना उपमहापौरपदाचा राजीनामा देण्यास सेना नेत्यांनी भाग पाडले होते. त्यामुळे ८ जानेवारी रोजी उपमहापौरपदाची निवडणूक जाहीर झाली.
शिवसेनेचे ३ ते ४ नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले होते. परंतु, युतीकडे ६५ व आघाडीकडे ६१ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने पराभव अटळ असल्याचे लक्षात आल्यावर आव्हाडांनी लोकशाही आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेउन ही निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले. त्यामुळे या पदासाठी भाजपचे मुकेश मोकाशी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची ८ तारखेला उपमहापौर म्हणून होणारी निवड ही औपचारिकताच राहिली आहे.
दरम्यान, ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकरांसंदर्भात जी घटना घडली त्याबाबत स्थानिक पोलिसांची कारवाई संशयास्पद असल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांना अटक केली नाही. त्याच्या निषेधार्थ आघाडीचे सर्व नगरसेवक राजीनामे देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.