www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महायुती आणि आघाडीकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्यामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून मतदान होणार होतं. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर युतीमध्येही फूट पडलीये.
स्थायीत भाजपचे उमेदवार वाघुले हे एकमेव सदस्य आहे. वाघुलेंनी आपली उमेदवारी कायम ठेवली तर त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे.शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याला सत्ताधारी आघाडीनं आपल्या बाजूनं वळवलंय. महापालिकेतला सत्तासंघर्ष तर शिगेला पोहोचलाय.
स्थायी समितीवर आपलंच वर्चस्व असावं यासाठी युती आणि आघाडीमध्ये कडवा संघर्ष आहे. मात्र आघाडीमध्येच बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर युतीमध्येसुद्धा फूट पडलीय. आघाडीकडून यावेळी मनसेचे सुधाकर चव्हाण यांना उमेदवारी देण्याचं ठरलं होतं. मात्र ऐनवेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे संजय भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे सुधाकर चव्हाण नाराज आहेत.
आघाडीचा उमेदवारी अर्ज भरताना ते उपस्थित नव्हते. दुसरीकडे युतीतर्फे बसपाचे विलास कांबळे यांनी अर्ज भरलाय. त्याचवेळी भाजपाचे संजय वाघुले यांनीही अर्ज भरलाय. विशेष म्हणजे वाघुले यांच्या अर्जावर अनुमोदक आणि सूचक म्हणून राष्ट्रवादीचे रजिया शेख आणि गणेश साळवी यांनी सह्या केल्या आहेत.
आम्ही युतीचा धर्म पाळतो भाजपने युतीचा धर्म पाळावा असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हंटलंय. युती आणि आघाडीमधल्या नाराजी नाट्यामुळे येत्या ११ तारखेला होणारी स्थायीची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.