नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीआधी सर्वसाधारण बजेट सादर केलं जाऊ नये अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगात धाव घेतली..
विरोधी पक्षनेत्यांनी निवडणूक आयोगातील अधिका-यांची भेट घेतली. सर्वसाधारण बजेट 1 फेब्रुवारीला सादर केलं जातं. मात्र पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बजेट निवडणुकीआधी सादर करण्यात येऊ नये अशी विरोधकांची मागणी आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता 31 जानेवारीपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी पुढे होऊ लागलीय.
समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी ही मागणी केलीये. याला भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दिला होता.
तसंच आपले खासदार राष्ट्रपतींना भेटून बजेट अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी करणार असल्याचंही उद्धव यांनी जाहीर केलंय... भाजपानं मात्र निवडणुका आणि अर्थसंकल्पाचा संबंध नसल्याचं सांगत बजेटच्या तारखा योग्य असल्याचं म्हटलंय.