मुंबई : कारमध्ये बसण्यासाठी जर तुम्हाला पैसे दिले तर ? खरं वाटत नाही ना ? पण गुगलने मात्र ही ऑफर आणली आहे. तासाला १३०० रूपयांप्रमाणे भत्ता मिळविण्याची संधी गुगलने देणार आहे. मात्र ती फक्त अॅरिझोनातील पदवीधरांनाच मिळू शकणार आहे. याचे कारण म्हणजे गुगल त्यांच्या सेल्फड्रीव्हन कारच्या चाचण्या या भागात घेत आहे. त्यासाठी त्यांनी पदवीधरांकडून अर्ज मागविले आहेत.
काम इतकेच की निवड झालेल्या उमेदवारांनी या कारमध्ये बसायचे आणि तासाला २० डॉलर्स प्रमाणे पैसे घ्यायचे आहे. आठ तासाप्रमाणे महिन्याला ३ लाख रूपये पगार गुगल देणार आहे.
गुगलने त्यासाठी काही अटी देखील ठेवल्या आहेत. म्हणजे इच्छूक उमेदवार पदवीधर हवा तसेच त्याचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड असू नये. प्रतिमिनिट ४० शब्द या वेगाने टायपिंग करता यायला हवे आणि निवड झाल्यास १२ ते २४ महिन्यांचा करार त्याला करावा लागणार आहे. ही कार आपोआप चालणारीच आहे पण मध्येच काही गडबड झाली तर सीटवर बसलेल्या या उमेदवाराने कार सांभाळायची आहे. प्रत्येक सेशनचा लिखित आणि तोंडी फिडबॅक कंपनीला द्यायचा आहे. त्यानुसार कारमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.
गुगल त्यांचा सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकही या वर्षअखेर अमेरिकेत वापरात आणणार आहे.