नागपूर : ऑनलाइन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार देऊन मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल हातात पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अॅड. अंकुर कपले यांनी ९ ऑगस्टला ९,२४५ रुपयांच्या मोबाईलची ऑर्डर नोंदविली. १४ ऑगस्टला ५.१५ वाजता कुरियर बॉय पार्सल घेऊन आला. त्याच्याकडे पैसे देऊन त्यांनी पार्सल ताब्यात घेतले. एक्स्प्रेस डिलेव्हरी एन जी हॅटिनेस, असे इंग्रजीत मजकूर असलेले पार्सल उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला.
त्यात मोबाईलऐवजी सिमेंटचा दगड होता. याबाबत त्यांनी कुरियर बॉयसह विविध संबंधितांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. परिणामी आपली फसवणूक झाल्याने शेवटी त्यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली.