जळगाव : उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रातदेखील धडकली आहे. बहुतांश जिल्ह्यांचा पारा ४० अंशांपर्यंत गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून खान्देशात उष्णतेची मोठी लाट आली आहे. जळगाव, धुळ्यात ४१ तर नंदुरबारचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत भिडला आहे.
खान्देशात या उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना जळगावात घडलीय. काल सायंकाळी ही घटना घडली. जिल्ह्यातील अमळनेर मारवड गावातील जितेंद्र संजय माळी असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
जितेंद्र याने शेतात भर उन्हात दिवसभर काम केले. काम करता असतानाच त्याला सायंकाळी शेतातच चक्कर आली. त्याचे चुलत भाऊ महेंद्र आणि मजुरांनी त्याला खासगी डॉक्टरांकडे दाखल केले.
डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. मात्र तेथून अमळनेरला नेत असताना तो पुन्हा बेशुद्ध पडला. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. जितेंद्र याला उष्माघातसदृश्य लक्षणे होती. त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणारे डॉ. आशिष पाटील यांनी दिली.
वाढत्या तापमानाचा छोट्या पिकांनाही फटका
राज्यात वाढत्या तापमानाचा छोट्या पिकांनाही मोठा फटका बसत आहे. धना, मेथी यांसारखी छोटी पिके वाढत्या तापमानामुळे करपून जात आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात खर्च करून यासारखी छोटी छोटी पिके घेणारा शेतकरी उष्णतेच्या लाटेमुळे संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना वाचविण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन कृषी तज्ञांनी केलंय.