पुण्यातील इच्छुक उमेदवारांना मुख्यमंत्री सहायता निधीत ३ लाख जमा करण्याचे आदेश?

पुण्यातल्या आठ जागांसाठी भाजपामधून तब्बल १०३ इच्छुक उमेदवार

Updated: Aug 30, 2019, 09:41 AM IST
पुण्यातील इच्छुक उमेदवारांना मुख्यमंत्री सहायता निधीत ३ लाख जमा करण्याचे आदेश? title=

पुणे: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. मात्र, या मुलाखती गुरुवारी एका वेगळ्याच कारणामुळे गाजल्या. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तीन लाख रूपये जमा करावेत, अशा अलिखित आदेशाची पिंपरीमध्ये चर्चा रंगली होती. मात्र, यावर पक्षातील कोणत्याही नेत्याने भाष्य करायला नकार दिला.

तसेच मुलाखतीच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांना मज्जाव करण्यात आला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात आली. मात्र, यानंतर महापौरांकडून सारवासारव करण्यात आली. इच्छुक उमेदवारांनीच नव्हे तर ज्यांना शक्य आहे, त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीत पैसे द्यावेत, असे त्यांनी म्हटले. 

दरम्यान, पुण्यातल्या आठ जागांसाठी भाजपामधून तब्बल १०३ इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. शिवसेना-भाजपा युती होणार असल्याचे सांगितले जात असले तरी पुण्यामधल्या आठही जागांवर भाजपानं दावा सांगितल्याचे समजते. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी या मुलखाती घेतल्या. 

पुण्यामध्ये विधानसभेसाठी भाजपमधल्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. इच्छुकांच्या मुलाखती सुरु असताना शिवजीनगर मतदारसंघातील इच्छुकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ३० इतकी होती. त्याखालोखाल २१ इच्छुकांनी कॅंटोन्मेंट मधून उमेदवारी मागितली आहे. शहरातील सध्या आठही आमदार भाजपचे आहेत. असं असलं तरी शिवाजीनगरसह सर्वच ठिकाणची भाकरी फिरवून नवीन कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी इच्छुकांनी केली आहे. शहरात सर्वात कमी इच्छुक पर्वतीमध्ये आहेत.