पुणे: मी विधानसभा निवडणूक लढवत असलो तरी मुख्यमंत्री व्हायचा आपला कोणताही इरादा नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यंदा पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी एका वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असे मला सांगण्यात आले. परंतु, निवडणूक लढवीत असलो तरी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
'चंपा'ला पवार कुटुंबियांशिवाय दिसतं कोण?; अजितदादांची टीका
चंद्रकांत पाटील यांची कोथरूड मतदारसंघातील उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर काहीसे नाराजीचे वातावरण होते. मात्र, अमित शहा यांनीच मला कोथरूडमधून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.
'प्रणितीच्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही'
कोथरूडसह अन्य तीन मतदारसंघांचा विचार माझ्यासाठी झाला होता. यात कोल्हापूरचाही समावेश होता. मात्र, राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मला या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे कोथरूडमध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला होता. स्थानिक पातळीवरची नाराजी पाहता चंद्रकांत पाटील यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यताही काहीजणांकडून वर्तविण्यात आली आहे. याशिवाय, याठिकाणी विरोधकांनी मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पाठिशी ताकद उभी केली आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील या आव्हानाचा सामना कशाप्रकारे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.