Datta Jayanti 2022: हिंदू धर्मात दत्तात्रयांची मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा केली जाते. दत्त जयंती (Datta Jayanti 2022) मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला असते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रुप म्हणजे दत्त महाराज. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणून दत्त गुरुंना मानलं जातं. यंदा दत्त जयंती 7 डिसेंबर 2022 रोजी बुधवारी येत आहे. चंद्र कृत्तिका-रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत सिद्ध आणि सर्वार्थसिद्धी असा योग दत्त जयंतीला जुळून आला आहे. दत्त जयंतीनिमित्त अनेक घरांमध्ये आठवड्यापूर्वीच गुरुचरित्राचं पारायण (Gurucharitra Parayan) सुरु केलं जातं. काही जणांना पारायण शक्य नसल्याने दत्त जयंतीच्या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करतात.
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तात्रयांनी मनोभावे पूजा केली जाते. 7 डिसेंबरला सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला सुरुवात होईल आणि 8 डिसेंबरला 9 वाजून 38 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार दत्त जयंती 7 डिसेंबरला साजरी केली जाईल. संपूर्ण दिवस दत्त प्रभूंचं व्रत, पूजा, व्रत कथा आणि भजन-किर्तन करु शकता.
दत्त जयंतीला चौरंगावर लाल कपडा टाकून दत्तांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. देव्हाऱ्यात दत्तांची मूर्ती नसेल तर लाल कपड्यावर सुपारी ठेवून दत्तांचं आवाहन करावं. दत्त महाराजांना पिवळं फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी. एक तांब्या पाणी भरून जवळ ठेवावं. उजव्या हातात फुल आणि अक्षदा घेऊन नामस्मरण करावं. त्यानंतर 'ऊँ अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:, श्री दत्त परमात्मा देवता:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:।' या मंत्राचा जप करावा. श्री दत्ताची पूजा, धूप, दीप व आरती करावी. ऊँ द्रां दत्तात्रेयाय नम: या मंत्राने एक जप माळ करावी. धूप, दीप आणि आरती करावी. त्यानंतर माळेवर ऊँ द्रां दत्तात्रेयाय नम: या मंत्राचा जप करावा.
बातमी वाचा- Surya Gochar: दहा दिवसानंतर या राशींना मिळणार सूर्यबळ, तुमची रास आहे का? वाचा
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥