Grih Pravesh : कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्यात निर्धारित केलेल्या लक्ष्यांपैकी एक म्हणजे स्वत:चं घर खरेदी करणं. अपेक्षित शिक्षण, नोकरी वगैरे मिळाल्यानंतर अनेकजण स्वत:चं घर घेण्यासाठीची धडपड सुरु करतात. हे वाटतं तितकं सोपं नसतं. पण अशक्यही नसतं. घर घेतल्यानंतर गोष्टी तिथेच संपत नाहीत. तर, त्या घरातील नकारात्मक उर्जांचा नायनाट करुन एका सकारात्मक पर्वाची सुरुवात करण्यासाठी पूजाअर्चा केली जाणं महत्त्वाचं ठरतं. पूजा केल्याशिवाय सहसा कोणीही नव्या वास्तूमध्ये राहण्यास सुरुवात करत नाही.
हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या मान्यतांनुसार नव्या घरात प्रवेश करतेवेळी जी पूजा केली जाते तिचा गृहप्रवेश असं म्हणतात. गृहप्रवेशाशी संबंधित बरेच नियम शास्त्रांमघध्ये सांगण्यात आले आहे. अशा नियमांचं पालन करणं बंधनकारक नाही, पण नियमांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फायदाच होतो.
ज्योतिषविद्येनुसार गृहप्रवेश तीन प्रकारचे असतात. अपूर्व गृहप्रवेशाचा अर्थ आहे, पहिल्यांदाच घरात प्रवेश करणं. द्वितीय गृह प्रवेशाचा अर्थ आहे जुन्या खरेदी केलेल्या घरात प्रवेश करणं आणि तिसरा प्रकार म्हणजे पुनर्विकास केलेल्या घरात प्रवेश करणं.
गृहप्रवेशासंबंधीचे नियम आणि काही समजुती काय आहेत, एकदा पाहा...
- घरात प्रवेश करतेवेळी गणपतीची स्थापना आणि वास्तूपुजा नक्की करा.
- घरात पहिल्यांदाच प्रवेश करताना उजवा पाय आधी ठेवा. गृहप्रवेश पुजेनंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्याच घरात झोपावं.
- वास्तू पुजेनंतर घरमालकानं पूर्ण घरात फेरी मारावी.
- महिलांनी पाण्यानं भरलेला कलश हातात घेऊन पूर्ण घरात फेरी मारावी आणि प्रत्येक ठिकाणी फूल ठेवावं.
- गृहप्रवेश केल्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी किंवा दुधानं भरलेला कलश मंदिरात अर्पण करावा.
- गृहप्रवेशाच्या दिवशी घरात दूध ओतू जाऊ देणं शुभ असतं.
- गृहप्रवेशानंतर किमान 40 दिवसांसाठी घर रिकामं ठेवू नये. कमीत कमी एका सदस्यानं तरी घरात थांबावं.