'जर विराट कोहली फॉर्ममध्ये येत नसेल तर....,' दिग्गज खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'गावसकर अन् राहुल द्रविड...'

चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धा तोंडावर आलेली असतानाही भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहलीला मात्र अद्यापही फॉर्म गवसलेला नाही.   

शिवराज यादव | Updated: Feb 10, 2025, 08:42 PM IST
'जर विराट कोहली फॉर्ममध्ये येत नसेल तर....,' दिग्गज खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'गावसकर अन् राहुल द्रविड...' title=

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिका खेळत असून, यावेळी सर्वांचं लक्ष कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे आहे. रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात शतक ठोकत चाहत्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली निराशा दूर केली आहे. मात्र दुसरीकडे स्टार खेळाडू विराट कोहली मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. विराट कोहली मागील तीन महिन्यांपासून आपल्या कौशल्याला साजेशी खेळी करु शकलेला नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये एक शतक वगळता कोणतीही मोठी खेळी त्याने केली नाही. दरम्यान जखमी असल्याने इंग्लंडविरोधातील पहिला एकदिवसीय सामना तो खेळू शकला नाही. पण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 8 चेंडूत फक्त 5 धावा करुन बाद झाला. 

आगामी चॅम्पिअन्स ट्रॉफी लक्षात घेता विराट कोहली फॉर्ममध्ये नसणं भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकतं. दरम्यान 1996 वर्ल्डकप विजेत्या श्रीलंका संघाचा कर्णधार अर्जुन राणातुंगाने विराट कोहलीने भारताच्या दिग्गज खेळाडूंकडून मदत घेतली पाहिजे असं मत मांडलं आहे. 

"मला वाटतं विराट कोहलीने सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर किंवा राहुल द्रविंड यांच्याशी चर्चा केली पाहिजे. हे आपण करु शकतो. ते त्याला मदत करु शकतात," असं अर्जुन राणातुंगाने 'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मात्र यावेळी त्याने विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरुन सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. 

"विराट कोहलीसारखा खेळाडू ज्याने इतक्या धावा केल्या आहेत, त्याच्यातील सर्वोत्तम कामगिरी अद्याप शिल्लक आहे असं वाटतं. कोहलीनेच याचा निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळे त्याला तो घेऊ द्यावा. त्याच्यावर नेहमी स्पॉटलाइट का असावी? हे गरजेचं नाही असं मला वाटतं. तो त्याचा निर्णय आहे आणि त्याला तो घेऊ द्यावा," असं त्याने म्हटलं आहे.

"तो ज्या प्रकारचा फलंदाज आहे आणि खेळाडू आहे ते पाहता त्याला लयीत येण्यासाठी फक्त एका चांगल्या खेळीची गरज आहे," असंही तो म्हणाला. दरम्यान विराट कोहली अपयशी ठरला असला तरी रोहित शर्माने जबरदस्त शतक ठोकलं आहे. इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने एक चांगली खेळी जगाचा त्यांच्यावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करेल असं तो म्हणाला आहे. 

"समालोचक म्हणून काम करणारे माजी खेळाडू अनेकदा म्हणतात की संघर्ष करणाऱ्या खेळाडूला फॉर्ममध्ये परतण्यासाठी एका चांगल्या शॉटची आवश्यकता असते, परंतु मला वाटते की ती एका चांगल्या इनिंगची बाब आहे. विराट आणि रोहितसारखे खेळाडू चांगले स्ट्रोक खेळण्यापेक्षा त्यांच्या देशासाठी सामना जिंकू इच्छितात," असं तो म्हणाला.

"जर एखादा खेळाडू नाबाद राहू शकला तर तो म्हणू शकतो की त्याचा फॉर्म परतला आहे. विराट आणि रोहित चाहत्यांचे त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानू इच्छितात. आजकाल प्रत्येकजण षटकार मारत आहे, परंतु एक खेळाडू म्हणून, तुम्हाला सामने जिंकायचे आहेत," असंही त्याने सांगितलं.