प्रपोजला नकार देणाऱ्या मुलीला मारहाण प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; तो तरुण तर...; पोलीसही चक्रावले

Viral Video: विद्यार्थिनीने मिठाई खाण्यास नकार दिला असता आणि त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्यावर मिठाई फेकली. नंतर त्याने मिठाईचा डबाही फेकून मारला. यावेळी त्याचा मित्र व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.   

शिवराज यादव | Updated: Feb 10, 2025, 07:05 PM IST
प्रपोजला नकार देणाऱ्या मुलीला मारहाण प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; तो तरुण तर...; पोलीसही चक्रावले title=

Viral Video: उत्तर प्रदेशात एका विद्यार्थिनीसह गैरवर्तन आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्याने मारहाण केली आहे, तो इतर कोणी नसून कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सीएचओवर रोझ डेच्या दिवशी तरुणीला प्रपोज केल्याचा आरोप आहे.  पीडित मुलीशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत 24 तासांच्या आत त्याला अटक केली आहे. 

पोलिसांनी आरोपीला जन्माची अद्दल घडवली आहे. पोलिसांनी शेअर केलेल्या अटकेच्या व्हिडीओत ते स्पष्ट दिसत आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याचा आधार घेत चालताना दिसत आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं आहे. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. 

जबरदस्ती मिठाई भरवण्याचा प्रयत्न

हसनपूरमधील गाव अल्लीपूर खादर येथे राहणारा बलविंदर उर्फ मोंटी नोनेर गावातील हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदावर तैनात आहे. तर मुलगी 11 वीची विद्यार्थिनी आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच गावात वास्तव्यास आहेत. ती वेलनेस सेंटरवर येत जात असे. यामुळे दोघांमध्ये ओळख झाली होती. रोझ डे च्या दिवशी बलविंदरने मुलीला प्रपोज केलं, पण तिने नकार दिला. यानंतर त्याने तिला जबरदस्ती मिठाई भरवण्याचा प्रयत्न केला. 

नकार दिल्यानंतर तरुणीवर फेकली मिठाई

जेव्हा तरुणीने मिठाई खाण्यास नकार दिला आणि त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने मिठाई तिच्या अंगावर फेकली. तरुणी दूर जाऊ लागली असता त्याने मिठाईचा बॉक्सही फेकून मारला. यादरम्यान त्याचे मित्र ही सगळी घटना मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते, ज्यामधे मुलीशी सतत गैरवर्तन केलं जात होतं. 

व्हिडीओत एक कारही दिसत आहे. यामध्ये आरोपी सीएचओ, पीडित मुलगी आणि एक अन्य मुलगा दिसत आहे. आरोपीने त्या तरुणानंतर तिला मिठाई भरवण्याचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर पीडिता गजरौला पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तिथे तिने आरोपी बलविंदर विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, कोर्टात हजर केलं आहे.  सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.