आशिष नेहराने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला ‘हीच योग्य वेळ’

टीम इंडियाचा वेगवान बॉलर आशिष नेहरा याने गुरूवारी निवॄत्तीची घोषणा केली. तो न्यूझीलंड विरूद्ध होत असलेल्या १ नोव्हेंबरच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

Updated: Oct 12, 2017, 08:06 PM IST
आशिष नेहराने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला ‘हीच योग्य वेळ’ title=

हैदराबाद : टीम इंडियाचा वेगवान बॉलर आशिष नेहरा याने गुरूवारी निवॄत्तीची घोषणा केली. तो न्यूझीलंड विरूद्ध होत असलेल्या १ नोव्हेंबरच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तो निवॄत्तीची घोषणा करणार अशी चर्चा रंगली होती अखेर त्याने आज घोषणा केली. नेहरा म्हणाला की, ‘मी टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीच्या प्रमुखांसोबत बोललो आहे. माझ्यासाठी होमग्राऊंडवर खेळताना प्रेक्षकांना अलविदा करण्यापेक्षा मोठा क्षण असू शकत नाही. त्याच मैदानावर मी २० वर्षांपूर्वी पहिला रणजी सामन खेळलो होतो. मला नेहमीच यशस्वी झाल्यावर संन्यास घ्यायचा होता. मला वाटतं हीच योग्य वेळ आहे आणि माझ्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय’. 

भारत आणि न्यूझीलंडमध्ये २२ ऑक्टोबरपासून तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची सीरिज खेळली जाणार आहे. नेहराची ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सीरिजसाठी निवड झाली होती. पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. तो म्हणाला की, ‘मी जेव्हा सीरिज खेळण्यासाठी आलो तेव्हा तयारीनिशी आलो होतो. मी कर्णधार विराट कोहली आणि कोच रवि शास्त्री यांच्याशी सरळ चर्चा केली. मी गेल्या २ वर्षात सर्वच टी-२० सामने खेळले आहे. मी त्यांना माहिती दिलीये. हा निर्णय अचानक घेतला नाहीये. टीममधील तरूण वेगवान बॉलर्सना बघूनच हा निर्णय घेतलाय’.

नेहरा पुढे म्हणाला की, ‘भुवनेश्वर माझी जबाबदारी घेण्यासाठी योग्य आहे. बुमराह आणि मी आधी खेळायचो. आता भुवी चांगलं प्रदर्शन करत आहे. ड्रेसिंग रूममध्ये माझ्याबाबत लोक काय बोलतात ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. सगळेच बोलताहेत की, मी अजून एक-दीड वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो’.

भारतासाठी १९९९ मध्ये करिअरचा पहिला सामना खेळणा-या नेहराने ११७ टेस्ट, १२० वनडे आणि २६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने टेस्टमध्ये ४४, वनडेत १५७ आणि टी-२० मध्ये ३४ विकेट घेतल्या आहेत. त्याला डरबनमध्ये २००३ वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरूद्ध २३ रन देऊन सहा विकेट घेण्यासाठी ओळखलं जातं.