Australia Win World Cup 2023 Finals Thackeray Group Slams BJP: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला सहा विकेट्सने पराभूत करुन ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता झाला. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासहीत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने या सामन्याची तयारी ही क्रिकेटऐवजी राजकीय दृष्टीने अधिक होती अशी टीका करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. ठाकरे गटाने भारतीय क्रिकेटमध्ये राजकीय प्रभाव वाढल्याचा दावा करतानाच भारतीय जनता पार्टीचाच क्रिकेटवर दबदबा असल्याने क्रिकेटमध्ये घुसलेले राजकारण व प्रचारकी थाटमाट कमी होणे कठीण आहे, असा टोला लगावला आहे. बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह यांच्यावरही ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.
"भारताचा क्रिकेट संघ ‘वर्ल्ड कप’ जिंकेलच अशी हवा होती, पण सलग दहा सामने जिंकलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला व क्रिकेटचे जगज्जेतेपद ऑस्ट्रेलियाकडे गेले याकडे क्रिकेट रसिकांनी खिलाडू वृत्तीने पाहिले पाहिजे. खेळात हार-जीत व्हायचीच. क्रिकेटचा विश्वचषक जिंकण्याच्या ईर्षेने भारतीय संघ मैदानात उतरला होता. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमही खचाखच भरून ओसंडून वाहू लागले होते. देशभरात विजयाची दिवाळी साजरी करण्याची जय्यत तयारी झाली होती. विजयाचा चषक उंचावून अभिवादन घेण्यासाठी ‘मोदी’ स्टेडियमवर स्वतः पंतप्रधान मोदी हजर होते, पण विश्वचषक लढाईत आम्ही पराभूत झालो. मोदी यांना विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या हाती सुपूर्द करावा लागला. या स्पर्धेतील सर्व सामने भारत जिंकला होता व ऑस्ट्रेलियाने पाच सामने गमावले होते, पण अंतिम सामन्यात भारत जिंकला नाही. स्वतःस अजिंक्य, अजेय, महाशक्ती म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींच्या खास उपस्थितीत भारत पराभूत झाला याचे दुःख भारतीय जनता पक्षाच्या भक्तांना वाटले असेल. कारण भारत विश्वचषक जिंकणार आहे तो फक्त नरेंद्र मोदींमुळेच, असा आव आणि ताव हे लोक मारत होते," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
"‘मोदी है तो मुमकीन है’ हा खेळ त्यांना विश्वचषकात मोदी स्टेडियमवर करायचा होता, पण तसे घडले नाही. संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या संघाचा डाव अंतिम सामन्यात 240 धावांवरच आटोपला व तुलनेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी चांगली झाली. ऑस्ट्रेलियन संघाचे क्षेत्ररक्षण जबरदस्त होते व भारतीय संघाच्या धावा रोखण्यात ते यशस्वी ठरले. ट्रेव्हिस हेडने कव्हरवरून मागे धावत जात रोहित शर्माचा अप्रतिम झेल घेतला. या झेलची तुलना कपिल देवने 1983 च्या अंतिम लढतीत विव्ह रिचर्डस्च्या घेतलेल्या झेलाशी होत आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्वतःला झोकून दिले व आपण 9-10 सामने जिंकलेच आहेत, सगळेच फॉर्मात आहेत. त्यामुळे अंतिम सामनाही जिंकणारच अशा आत्मविश्वासात आपण राहिलो," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
नक्की वाचा >> '..तेव्हा भारतीय चाहते शांत का होते?' आफ्रिदीचा सवाल; संतापून म्हणाला, 'कथित सुशिक्षित..'
"अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण क्रिकेटमय कमी व राजकीय जास्त वाटत होते. हा जणू भाजपचा विजय सोहळा आहे अशा प्रकारची लगबग तेथे होती. क्रिकेट खेळाडूंना तेथे महत्त्व असते तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कपिल देव, धोनी या विश्वचषक जिंकणाऱ्या क्रिकेट योद्ध्यांना अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने सन्मानाने बोलावले असते, पण वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपल्याला आमंत्रण नव्हते, अशी खंत कपिल देव यांनी व्यक्त केली. 1983 चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव होते. 2011 चा वर्ल्ड कप एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला, पण मोदी स्टेडियमवर या दोन महान खेळाडूंना निमंत्रण नव्हते. अनेक भाजप नेते, चित्रपट कलावंत हजर होते, पण कपिल देव, धोनी नव्हते. हे असे का? याचा खुलासा भारतीय क्रिकेट मंडळाने केला पाहिजे व कपिल, धोनी यांना निमंत्रण का नाही? असे सध्याच्या दिग्गज क्रिकेटवीरांनी क्रिकेट नियामक मंडळास विचारायला हवे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
ठाकरे गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव जय शाह तसेच केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावरही थेट उल्लेख न करता निशाणा साधला आहे. "क्रिकेटवर राजकारण्यांनी कब्जा केल्यापासून तेथे सट्टेबाजी वाढली असल्याचा ठपका न्या. लोढा कमिशनने ठेवला. क्रिकेट राजकीय नेत्यांपासून मुक्त केल्याशिवाय खेळातली सट्टेबाजी थांबणार नाही, असे न्या. लोढा अहवाल सांगतो. पण आज भारतीय क्रिकेटची सर्व सूत्रे भाजपकडे आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाच्या खजिन्यात साधारण साडेसहा हजार कोटी जमा आहेत. भाजपचा ‘वंशवाद’ भारतीय क्रिकेटचे नेतृत्व करीत आहे. आयपीएलचे कमिशनर कोण? तर ते आहेत भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू. त्यामुळे क्रिकेटमध्ये घुसलेले राजकारण व प्रचारकी थाटमाट कमी होणे कठीण आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'मला घाणेरडे...'; ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी संतापली
"जंतर मंतरवर न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या समाचारासाठी भाजपचा एकही नेता, मंत्री गेला नाही. पण अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलला पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह सगळेच हजर होते. भारत विश्वचषक जिंकू शकला नाही याचे दुःख आहे, पण जिंकल्यानंतर भाजपने विश्वचषक ताब्यात घेऊन मिरवण्याची जी तयारी केली होती त्यावर मात्र पाणी पडले. 2024 ला आम्हीच जिंकू, असे सांगणाऱ्यांना मोदी स्टेडियमवरच धक्का बसला. भारतीय संघाची कामगिरी उत्तमच होती. जगातला सर्वेत्कृष्ट संघ म्हणून भारतीय संघास मान्यता आहे. पण ‘मोदी’ स्टेडियमवर अपयश आले म्हणून खचून जाता कामा नये. खऱ्या खेळात हे व्हायचेच! मोदी स्टेडियमवर राजकारण हरले; पण क्रिकेट जिंकले," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.