IPL 2024: मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. रोहित शर्माची जागा घेत मुंबईचा कर्णधार झालेल्या हार्दिक पांड्याला पहिल्या दोन्ही सामन्यात अपयश आलं आहे. यानंतर चाहत्यांचा रोष आणखी वाढला असून, त्याला मैदानापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे ट्रोल केलं जात आहे. पहिल्या सामन्यात गुजरातने पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा दारुण पराभव केला आहे. दरम्यान हार्दिक पांड्यावर चाहत्यांकडून होणाऱ्या टीकेवर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टिव्ह स्मिथने चाहत्यांकडून होणारा अपमान, टीका कशी हाताळायची याचा सल्ला दिला आहे. स्टिव्ह स्मिथला अशा स्थितीचा सामना याआधी करावा लागला होता. "मी इतकंच सांगेन की त्याकडे पूर्ण दुर्लक्ष कर. हे सर्व अप्रासंगिक आहे. बाहेरील कोणालाही तू नेमक्या कोणत्या स्थितीतून जात आहेस याची कल्पना नाही. बाहरेचं कोणीही तुझ्यासह चेंजरुममध्ये नसतं," असं स्टिव्ह स्मिथने म्हटलं आहे.
"वैयक्तिकरित्या, मला अशा गोष्टींमुळे फरक पडत नाही. मी अजिबात चिंता करत नाही. मी त्याकडे लक्षही देत नाही. हे सगळे विनाकारण होणारे आवाज असतात. पण खेळाडूंना हे ऐकू येत असतं, आणि प्रत्येकजण आपल्या भावनांनुसार त्याकडे पाहत व्यक्त होतात. हार्दिकलाही कदाचित यामुळे फरक पडत असेल. हे शक्य आहे. त्याने आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर याआधी असा अनुभव घेतलेला नाही. त्यामुळे हे नैसर्गिक आहे. त्यात भारतात तुम्ही क्रिकेट स्टार असताना त्याच चाहत्यांनी अशाप्रकारे टीकेची झोड उठवणं याचा अनुभव त्याने घेतला नसेल," असं स्टिव्ह स्मिथ म्हणाला.
आयपीएल 2017 मध्ये स्टिव्ह स्मिथला महेंद्रसिंह धोनीच्या जागी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. धोनीसह असणाऱ्या आपल्या मैत्रीमुळे हे फार सोपं गेलं असल्याचं त्याने सांगितलं. "त्या हंगामात आम्ही फार मजा केली होती. आम्हाला तेव्हा चांगलं यशही मिळालं होतं, ज्याचा बहुतेक फायदा झाला. पण महेंद्रसिंह धोनी जे काही करतो त्यात उत्तम आहे. त्याने मला शक्य ती सर्व मदत केली. तो स्टम्पच्या मागे चांगला होता. त्याला तेथून मैदानात नेमकं काय सुरु आहे हे समजतं. त्यानुसार तो खेळाडूंना योग्य ठिकाणी उभा करतो," असं स्टिव्ह स्मिथने सांगितलं.
"हार्दिक पांड्या सध्या आव्हानात्मक वेळेचा सामना करत आहे. त्याने पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. त्याने आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माची जागा घेतली आहे. त्यामुळे त्याला चांगली सुरुवात मिळालेली नाही. तो नक्कीच सध्या दबावात आहे. वानखेडेमधील सामन्यात निकाल काय लागेल हे पाहावं लागेल. पण हार्दिक पांड्याला चिडवणं हे दुर्दैवी आहे. मुंबईत आता चाहत्यांची प्रतिक्रिया पाहावी लागेल," असं स्टिव्ह स्मिथ म्हणाला.