T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपची स्पर्धा आता मधल्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. स्पर्धेतील ग्रुप स्टेजचे सामने आठवडाभरात संपणार आहेत. त्यानंतर सुपर-8 सामने सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका सुपर-8 साठी पात्र ठरणारी पहिली टीम आहे. तर आता ऑस्ट्रेलियाच्या टीमनेही नामिबियाचा 9 विकेट्स राखून पराभव करत पुढच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. तर आता अ गटातून टीम इंडियानेही सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. दरम्यान अजून काही संघांचं स्थान निश्चित झालं नाहीये.
अशातच सुपर-8 ची लढत अजून रंगतदार बनली आहेत. यावेळी 3 टीम अशा आहेत ज्यांच्यावर टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन ग्रुप स्टेजमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. त्यापैकी एक इंग्लंड आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी एक पर्याय सुचवला आहे.
इंग्लंड ही टी-20 वर्ल्डकपची गतविजेती टीम आहे. मात्र वनडे वर्ल्डरप प्रमाणे या वर्ल्डकपमध्येही त्यांच्यावर या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. नामिबियाला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूडने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, त्याने इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा पराभव सहन करेल असं विधान केलंय. यावेळी हेझलवूडच्या वक्तव्याने सर्वचजण हैराण झाले आहेत.
यावेळी हेझलवूडला टी-20 वर्ल्डकप आणि इंग्लंडच्या समीकरणाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने जोस बटलरच्या टीमचं खूप कौतुक केलं. या फॉरमॅटमध्ये इंग्लंडची टीम अतिशय धोकादायक असून त्याचं या स्पर्धेतून बाहेर पडणं ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरणार आहे, असं त्याने सांगितले. ऑस्ट्रेलिया आधीच पात्र ठरला आहे. इंग्लंडला बाहेर पाडण्यासाठी स्कॉटलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला, तरी टीम त्याचा नक्की विचार करेल असंही त्याचं म्हणणं आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. यामुळे पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन आणि न्यूझीलंडसारख्या बड्या टीमशिवाय इंग्लंडलाही ग्रुप स्टेजमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची टीम बी गटात आहेत. नामिबिया आणि ओमान यापूर्वीच या गटातून बाहेर पडले आहेत. या गटातील उर्वरित 3 टीमपैकी ऑस्ट्रेलिया यापूर्वीच सुपर 8 मध्ये पोहोचली होती.
बी गटातून आता सुपर-8 साठी फक्त एकच टीम उरली असून स्कॉटलंड आणि इंग्लंडया दोन टीम या शर्यतीत आहेत. स्कॉटलंड तीनपैकी 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांना हरवलं तर इंग्लंडची पात्र होण्याची शक्यता वाढणार आहे. यानंतर इंग्लंडला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. जर ऑस्ट्रेलिया स्कॉटलंडकडून हरली तर त्यांचे 7 गुण होतील आणि ते ऑस्ट्रेलियासह सुपर-8 मध्ये जाऊ शकतात.