भारतीय टीमच्या सुरक्षेसाठी कायपण! आयसीसीचं बीसीसीआयला आश्वासन

आगामी क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय टीमला चोख सुरक्षा पुरवली जाईल

Updated: Feb 28, 2019, 06:36 PM IST
भारतीय टीमच्या सुरक्षेसाठी कायपण! आयसीसीचं बीसीसीआयला आश्वासन title=

दुबई : आगामी क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय टीमला चोख सुरक्षा पुरवली जाईल, असं आश्वासन आयसीसीनं बीसीसीआयला दिलं आहे. पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयनं वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करणारं पत्र लिहीलं होतं. यावर आयसीसीनं त्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत भारतीय टीमच्या सुरक्षेसाठी शक्य तेवढं सगळं केलं जाईल, असं सांगितलं. आयसीसीच्या बैठकीमध्ये बीसीसीआयकडून राहुल जोहरी यांनी भारतीय टीम, मॅच अधिकारी आणि भारतीय प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलला होता.

राहुल जोहरी यांनी आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं बनवलेल्या सुरक्षा योजनांवर आम्हाला विश्वास असल्याचं जोहरी यांनी आयसीसीच्या बैठकीत सांगितलं. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 'आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी सुरक्षेबद्दल बीसीसीआयला आश्वस्त केलं. या बैठकीमध्ये सुरुवातीला सुरक्षेचा मुद्दा नव्हता, पण बीसीसीआयनं जोर दिल्यामुळे औपचारिकरित्या हा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला.'

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. १६ जुनला भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपची मॅच होणार आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांनीही या मागणीचं समर्थन केलं आहे. तर पाकिस्तानविरुद्ध न खेळून त्यांना फुकटचे २ अंक देण्यापेक्षा त्यांचा पराभव करा, असं मत सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी मांडलं आहे.