मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळू शकतो. खेल रत्न हा पुरस्कार देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) ने विराट कोहलीला हा पुरस्कार देण्याची शिफारस केलीये. दरवर्षी जुलै अथवा ऑगस्टमध्ये होणाऱ्या स्पोर्ट्स अॅवॉर्डस् कमिटीच्या बैठकीत या पुरस्कारावर अखेरची मोहोर उमटवली जाते.
तसेच भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मंधाना यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीये. इतकंच नव्हे तर बोर्डाने माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देण्याचीही शिफारस केलीये. कसोटीत दहा हजार धावा पूर्ण करणारे गावस्कर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय.
१९९१ पासून खेलरत्न देण्याची परंपरा सुरु करण्यात आली. आतापर्यंत ३४ खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आलाय. यात केवळ दोन क्रिकेटरचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरला १९९७-९८साठी तर २००७मध्ये धोनीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर विराटची या पुरस्कारासाठी निवड झाली तर हा पुरस्कार मिळवणारा तो तिसरा क्रिकेटर ठरेल.