मुंबई : आजीवन बंदी घालण्यात आलेला माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने बीसीसीआय विरुद्ध आवाज उठविल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपण दुसऱ्या देशातून खेळू शकतो या श्रीसंतच्या विधानाला आता बीसीसीआयने उत्तर दिले आहे.
बीसीसीआयने घातलेली आजीवन क्रिकेटबंदी केरळ उच्च न्यायालयाने कायम ठेवली त्यामुळे संतापलेल्या श्रीसंतने आपण दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो, असे जाहीरपणे म्हटले होते. त्यामुळे श्रीसंत दुसऱ्या देशाकडून खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण यावर बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बीसीसीआयने घातलेली आजन्म बंदी केरळ उच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने श्रीसंतच्या अडचणीत वाढ झाली.
“आयसीसीचे नियम स्पष्ट आहेत आणि श्रीशांत दुसऱ्या कोणत्याही देशाकडून खेळू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया बीसीसीआयने त्याच्या विधानावर दिली.
“आयसीसीचा सदस्य असलेल्या देशाने एखाद्या खेळाडूवर बंदी घातली तर तो दुसऱ्या सदस्य देशाकडून किंवा संस्थेकडून खेळू शकत नाही. त्याच्या विधानाला अर्थ नाही, आम्हाला कायदेशीर बाबी माहित आहेत.” असे विधान बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी केले आहे. त्यामुळे श्रीसंतला चपराक बसली आहे. आता यावर श्रीसंत काय प्रतिक्रीया देतोय हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.