कोलकाता : कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली मात्र अजूनही आयपीएल खेळवण्यासाठी आशावादी आहे. आयपीएलच्या आयोजनासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जात असल्याचे संकेत सौरव गांगुलीने दिले.
बुधवारी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपबाबतचा निर्णय पुढील महिन्यापर्यंत टाळण्यात आला. यानंतर सौरव गांगुलीने भारतातल्या राज्य संघटनांना पत्र लिहिलं. या पत्रात बीसीसीआय आयपीएल खेळवण्यासाठीच्या सगळ्या पर्यायांचा विचार करत असल्याचं गांगुलीने म्हणलं आहे.
'आयपीएल स्टेडियममधल्या प्रेक्षकांशिवाय खेळवण्याबाबत विचार सुरू आहे. चाहते, फ्रॅन्चायजी, खेळाडू, प्रसारक आणि प्रायोजक हे सगळे आयपीएलच्या आयोजनाबाबत उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर देशांच्या खेळाडूंनीही यंदाच्या वर्षीही या स्पर्धेत सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही आयपीएलच्या आयोजनासाठी आशावादी आहोत. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल,' असं सौरव गांगुली म्हणाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० वर्ल्ड नियोजित वेळेत झाला नाही, तर त्यावेळी आयपीएलचं आयोजन केलं जाईल, असं बोललं जात आहे. या पत्रात सौरव गांगुलीने स्थानिक क्रिकेटच्या आयोजनाबाबतही भाष्यं केलं आहे.
रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धांसाठीची योजना तयार करण्याचं काम सुरू आहे. पुढच्या २ आठवड्यांमध्ये याबाबत माहिती दिली जाईल, असं सौरव गांगुली म्हणाला.
आयपीएल दुबईमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव युएई क्रिकेट बोर्डाने आधीच बीसीसीआयला दिला आहे. दुसरीकडे श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही आपण आयपीएलचं आयोजन करण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं होतं. या दोन्ही बोर्डांच्या प्रस्तावावर बीसीसीआयने अजून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.