Shakib al Hasan Retirement : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर (Kanpur Green Park Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकिब अल हसनने (Shakib al Hasan) निवृत्तीची घोषणा केली आहे. टी20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं सांगत शाकिबने कसोटी क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार हे देखिल स्पष्ट केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात मीरपूरमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना होणार आहे. या सामन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा शाकिबने व्यक्त केली आहे. यासाठी त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डालाही विनंती केली आहे.
शाकिब अल हसनवर हत्येचा आरोप
पण भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर बांगलादेशमध्ये पोहोचताच शाकिब अल हसनला अटक होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये शाकिबवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली. पण त्याआधी शाकिब अल हसन हा शेख हसीना सरकारच्या आवामी लीगचा खासदार होता. विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका व्यक्तीने शाकिबसह 156 लोकांवर आपला मुलगा रुबेलच्या हत्येचा आरोप केला आहे.
बीसीबीची भूमिका
शाकिब अल हसनवर होत असलेल्या आरोपांवर बीसीबीने (BCB) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत शाकिबवरचे दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्याला देशाकडून क्रिकेट खेळण्यापासून रोखलं जाणार नाही. इतकंच नाही तर बांगलादेश सरकारनेही कोणत्याही पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
बांगालेदशमध्ये पोहोचताच शाकिबला अटक होणार?
हत्येच्या आरोपामुळे बांगलादेशमध्ये पोहोचताच शाकिबला अटक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण शाकिबला अटक होणार नाही किंवा त्याला कोणत्याही कारणाने त्रास दिला जाणार नाही असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. भारत वि. बांगलादेश दुसरा कसोटी सामना दरम्यान भारताविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शाकिब अल हसन खेळणार आहे. 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून टी20 मालिका रंगेल. भारत आणि बांगलादेशदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिक खेळवली जाणार आहे.
शाकिबची क्रिकेट कारकिर्द
शाकिब अल हसन हा बांगलादेशचा सर्वात अनुभवी क्रिकटपटू आहे. शाकिब बांगलादेश साठी आतापर्यंत 70 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 4600 धावा केल्या आहेत. तर 242 विकेट त्याच्या नावार आहेत. तर टी20 क्रिकेटमधअये शाकिबने 129 सामन्यात 2551 धावा आणि 149 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात शाकिबने 247 सामन्यात 7570 धावा आणि 317 विकेट घेतल्या आहेत.