कोलंबो : दिनेश कार्तिकच्या झुंजार खेळीमुळे भारताने रविवारी बांगलादेशला निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये चार विकेटनी हरवले.
अखेरच्या क्षणी कठीण वाटणारे आव्हान दिनेश कार्तिकने पेलले आणि भारताला विजय मिळवून दिला. तो सामन्याचा खरा हिरो ठरला. अखेरच्या बॉलवर सिक्सर खेचत त्याने विजय खेचून आणला.
सामना संपल्यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला, मी माझ्या कामगिरीने खुश आहे. संघाला विजय मिळवून दिल्याने खूप आनंद होतोय. संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी केली. जर फायनलमध्ये हरलो असतो तर खूप वाईट वाटले असते. ज्याप्रमाणे मुस्तफिझुर गोलंदाजी करत होता त्याच्यासमोर बॅटिंग करणे सोपे नव्हते. भारतीय संघात स्थान मिळणे कठीण असते. मात्र पुन्हा एकदा संधी मिळाल्याने ती कायम कशी ठेवता येईल याचा प्रयत्न करणार आहे. याचे श्रेय जाते सपोर्टिंग स्टाफला.
भारतासमोर विजयासाठी बांगलादेशने १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी ३४ रन्स हवे होते. यावेळी कार्तिकने (८ बॉलमध्ये २९ रन्स) क्रीझवर पाय ठेवला. त्याने रुबेल हुसैनच्या १९व्या ओव्हरमध्ये दोन फोर आणि दोन सिक्स लगावत २२ रन्स केले. शेवटच्या ६ बॉलमध्ये भारताला १२ रन्स हवेत होते. यावेळी विजय शंकर पहिल्या बॉलवर आऊट झाला. त्यानंतर एका बॉलमध्ये भारताला जिंकण्यासाठी ५ रन्स हवे असताना कार्तिकने सौम्या सरकारच्या बॉलवर सिक्सर खेचत विजय मिळवला. भारताचा टी-२०मध्ये बांगलादेशवर हा सलग आठवा विजय आहे.