मुंबई : आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगला होता. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात किवींनी टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव केला. टी-20 विश्वचषकातील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कठीण झाल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवण्यात आलं होतं. ज्यावर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तीव्र नाराजी दर्शवत संताप व्यक्त केला आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटला रोहित शर्मावर विश्वास नव्हता की तो ट्रेंट बोल्टचा सामना करू शकेल? असा सवाल गावस्कर यांनी उपस्थित केला आहे.
मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटच्या महान खेळाडूंमध्ये रोहित शर्माची गणना केली जाते. 20 वर्ल्डकपनंतर तो सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताचं नेतृत्व करणार आहे. रविवारी रात्री दुबईत झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इशान किशनला ओपनिंगला पाठवून डावाची सुरुवात करण्यासाठी दिले. त्याचवेळी रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
मीडियाशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, "तुम्ही सलामीला तरुण खेळाडूला पाठवता. त्याचबरोबर रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूला तुम्ही खाली उतरवता. रोहित शर्माने स्वतः 3 नंबरवर खेळायचं आहे असं सांगितले असतं तर गोष्ट वेगळी आहे. पण तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे, असं रोहितने सांगितलं नाही तर रोहितला पहिलं किंवा दुसऱ्या क्रमांकावर गेलं पाहिजे."
"तुम्ही सलामीची जोडी फोडली आणि नवीन खेळाडू आणला. त्यानंतर रोहितला नंबर-3 आणि कोहलीला नंबर-4 वर पाठवलं जातं. सुरुवातीला इशान किशनने 70-80 धावा केल्या असत्या तर सर्वांनी हा योग्य निर्णय असल्याचं म्हटलं असतं. आणि आता तुम्हालाही टीका सहन करावी लागेल," असेही खडे बोल गावस्कर यांनी सुनावलेत.