अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने संघाने भारताचा पराभव केल्यानंतर मोहम्मद कैफने त्यांचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलिया संघ मैदान आणि कागदावर चांगला होता असं त्याने म्हटलं आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने भारताची विजयी घोडदौर खंडीत केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारताला 254 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताने हा सामना 79 धावांनी गमावला आणि तोंडचा घास गमावला. यासह ऑस्ट्रेलियाने 2010 नंतर पहिली आणि आतापर्यंतची चौथी ट्रॉफी जिंकली. दरम्यान या सामन्यानंतर मोहम्मद कैफने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत ऑस्ट्रेलिया संघाचं कौतुक केलं.
मोहम्मद कैफने एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "अंडर-19 स्तरावर निकालाने जास्त फरक पडत नाही. पण भविष्यातील हे स्टार यातून धडा शिकतात जो त्यांना पुढील प्रवासात मदत करतो. भारतीय संघाने चांगला खेळ केला. यावेळी मला म्हणावं लागेल की ऑस्ट्रेलिया संघ मैदान आणि पेपरवरही चांगला होता".
At u-19 level team results don't matter much. Future stars learn lesson that help them in long journey.. Well played India. This time have to say Australia good on pitch, and on paper #U19WorldCup2024
— Mohammad Kaif (@MohammadKaif) February 11, 2024
एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यानंतर मोहम्मद कैफने केलेल्या विधानावर गौतम गंभीरने टीका केली होती. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला हे बरं झालं असं त्याने म्हटलं होतं. त्यामुळे मोहम्मद कैफच्या या पोस्टवर आता गौतम गंभीर काही म्हणतो की नाही हे पाहावं लागेल.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 43.5 ओव्हर्समध्ये फक्त 174 धावांवर सर्वबाद झाला. आदर्श सिंग (47) आणि मुरुगन अभिषेक (42) फक्त या दोनच फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी झुंज दिली.
सामन्यानंतर कर्णधार उदय सहारन याने पराभवानंतर प्रतिक्रिया देत सांगितलं की, "आम्ही काही वाईट फटके खेळलो. खेळपट्टीवर जास्त वेळ घालवू शकलो नाही. आम्ही तयारी केली होती, पण ती योग्य प्रकारे अंमलात आणू शकलो नाही," असे सहारनने मॅचनंतरच्या सादरीकरणादरम्यान सांगितलं.
"ही फार चांगली स्पर्धा होती. मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान आहे. ते सर्वजण चांगले खेळले. त्यांना चांगली लढवय्या प्रवृत्ती दाखवली, ज्याचा मला अभिमान आहे," असं त्याने म्हटलं आहे. "जर ऑस्ट्रेलियाने 250 पर्यंत धावसंख्या उभी केली, तर आम्ही नक्की जिंकू असा आत्मविश्वास होता. आमच्या संघाने संपूर्ण मालिकेत वर्चस्व राखलं. पण आज ते चुकीच्या बाजूने होते." अशी खंत त्याने व्यक्त केली.