ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन यंदा पाकिस्तानमध्ये केलं जाणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणार असल्याने आता आयसीसीने बैठकीचा तडाखा लावलाय. एकीकडे बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबी यांच्यातील वाद सुरू असतानाच आता टीम इंडियाने देखील तयारी सुरू केलीये. टीम इंडिया कोणत्या फलंदाजांसोबत मैदानात उतरेल? यावर सिलेक्शन कमिटीने पर्याय तयार करणं सुरू केलं आहे. अशातच आता श्रीलंका हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी न दिल्याने तो चॅम्पियन ट्रॉफी (Champions Trophy) खेळेल की नाही? यावर प्रश्न उभा राहिलाय. अशातच आता बीसीसीआयने हार्दिक पांड्याबाबत (Hardik Pandya) मोठा निर्णय घेतला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीच्या फिटनेस चाचणीचं परीक्षण केलं जाईल, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने समोर आली आहे. हार्दिक पांड्याला टी-ट्वेंटी कर्णधार किंवा उपकर्णधार न बनवण्यामागे फिटनेसची चिंता आणि वर्कलोड मॅनेजमेंट हे मुख्य घटक होते, अशी माहिती समोर आली होती. अशातच आता पांड्याला सर्व घटकांवर परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
टीम इंडियाकडे हार्दिक पांड्यासाठी पर्याय नाही, पण चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होत असल्याने त्यांनी अष्टपैलू गोलंदाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे बीसीसीआय अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता पांड्याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून दिला असला तरी देखील त्याला पुन्हा शुन्यापासून सुरूवात करावी लागेल. गेल्या कित्येक वर्षांपासून हार्दिक पांड्या देशांतर्गत क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेट खेळत नाही. त्यामुळे पांड्याला बीसीसीआयच्या निर्णयामुळे नक्कीच धक्का बसला आहे.
दरम्यान, एकीकडे क्रिकेट करियरमध्ये वादळ घोंगावत असताना दुसरीकडे पांड्याच्या खासगी आयुष्यात देखील संकट कमी झालं नाही. तीन दिवसांपूर्वी पांड्याने घटस्फोट जाहीर केला होता. पत्नी, नताशा स्टॅनकोविक आणि पांड्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पांड्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. संपूर्ण आयपीएल हंगाम खेळत त्याने आपला फिटनेस सिद्ध केला होता, त्यामुळे आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी महत्त्वाची ठरेल.