नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेट संघातील हरमनप्रीत कौर यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीये. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि देवेंद्र झांझरिया यांनाही राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
गुरुवारी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. चेतेश्वर आणि हरमनप्रीत यांच्याव्यतिरिक्त आणखी १७ जणांना अर्जुन पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेय.
देवेंद्र झांझरियाने रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. तर भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंगचीही खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीये. कॉमनवेल्थ स्पर्धेत सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रौप्य पदकाची कमाई केली होती. त्याला २०१५मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय.
टीम इंडियाचा मिस्टर डिपेंडेबल चेतेश्वर पुजारा आणि भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटर हरमनप्रीत कौर यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच सत्यव्रत काडियन, अँथनी अमलराज, प्रकाश नांजप्पा, जसवीर सिंह, देवेंद्र सिंह, चेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौर, साकेत मायनेनी, मरियप्पन थंगवेलु, वीजे श्वेता, खुशबीर कौर, राजीव अरोकिया, प्रशांती सिंह, एसव्ही सुनील, शिव शंकर प्रसाद चौरसिया और वरुण भाटी यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.