Rohit Sharma Records: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला (ICC ODI World Cup) सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) खेळवला जाणार आहे. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर (Chennai) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण त्याचबरोबर या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कामगिरीवरही भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम जमा होऊ शकतो.
रोहित शर्माच्या नावावर विक्रम?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम जमा होणार असून अशी कामगिरी करणार तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सतरा सामन्यात रोहित शर्माने 978 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 22 धावा केल्यास विश्वचषक स्पर्धेत त्याच्या हजार धावा पूर्ण होणार आहेत. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत वेगवान हजार धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे.
या खेळाडूचा रेकॉर्ड तोडणार
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचा विक्रम तोडण्यापासून रोहित शर्मा एक पाऊल दूर आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे. सौरव गांगुलीच्या नावावर 1006 धावा आहेत. रोहित शर्माने 29 धावा केल्यास तो गांगुलीला पछाडत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
2019 विश्वचषक स्पर्धेत 5 शतकं
रोहित शर्माने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत तब्बल 5 शतकं केली होती. या स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्कारावा लागला होता. या स्पर्धेत रोहितने बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रालंकेविरोधात शतकी खेळी केली होती. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही रोहित शर्माकडून अशाच कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहते बाळगून आहेत.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे भारताचे टॉप 10 फलंदाज
सचिन तेंडुलकर - 2278
विराट कोहली - 1030
सौरव गांगुली - 1006
रोहित शर्मा - 978
राहुल द्रविड़ - 860
वीरेंद्र सेहवाग - 843
मोहम्मद अझरुद्दीन - 826
एमएस धोनी - 780
युवराज सिंग - 738
कपिल देव - 669