मुंबई : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमधील पहिला सामना जिंकला. 7 विकेट्सने आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळाला आहे. हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. टॉसनंतर पावसाने खो घातला. मात्र नंतर सामना सुरू झालां.
हार्दिक पांड्याने या विजयाचं श्रेय टीममधील खेळाडूंना दिलं आहे. पांड्याच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळाल्याने क्रिकेटप्रेमींनाही दिलासा मिळाला आहे.
काय म्हणाला हार्दिक पांड्या
विजयाने सीरिजची सुरुवात करणं खूप चांगलं आहे. टीमच्या दृष्टीनं हा विजय आमच्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. या विजयामुळे मी खूप आनंदी आहे. उमरान मलिकने चांगली बॉलिंग केली. मी त्याला जास्त संधी देऊ शकलो नाही. उमरानकडे प्रतिभा आहे. आशा आहे की त्याला चांगली संधी मिळेल.
उमरानचं आयर्लंड सीरिजमधून पदार्पण
उमरानने आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यावर्षी उत्तम कामगिरी केली आहे. त्याची कामगिरी लक्षात घेऊन आयर्लंड सीरिज दरम्यान त्याला टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळाली. त्याला 12 ओव्हर्सपैकी 1 ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. त्यामध्ये 14 धावा दिल्या. युजवेंद्र चहलने उत्तम बॉलिंग केली.
टीम इंडियाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॉलिंग केली. तर आयर्लंड टीमला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागली. आयर्लंड टीमने भारताला विजयासाठी 109 धावांचं आव्हान दिलं होतं. जे भारताने 3 विकेट्स गमावून पूर्ण केले.
भारताकडून दीपक हुड्डा आणि हार्दिक पंड्या यांनी शानदार फटकेबाजी केली. दीपकने 29 चेंडूत 47 धावा केल्या तर हार्दिक पंड्याने 12 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. हार्दिकच्या नेतृत्वामध्ये टीमने उत्तम कामगिरी केली.