शेन वॉर्न म्हणतो, या दोन टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदार

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होणार आहे. यंदा हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे.

Updated: Feb 5, 2019, 09:25 PM IST
शेन वॉर्न म्हणतो, या दोन टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदार title=

मुंबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होणार आहे. यंदा हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या वर्ल्ड कपसाठी आता प्रत्येक टीमनं त्यांच्या तयारीला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्ननं या वर्ल्ड कपबद्दल त्याचा अंदाज वर्तवला आहे. भारत आणि इंग्लंड या दोन टीम वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असतील, असं शेन वॉर्न म्हणाला. याबद्दलचं एक ट्विट शेन वॉर्ननं केलं आहे. भारत आणि इंग्लंडबरोबरच ऑस्ट्रेलियालाही संधी असल्याचं शेन वॉर्नला वाटतंय.

'यंदाचा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया जिंकू शकते. ऑस्ट्रेलियाकडे तसे खेळाडू आहेत. पण इंग्लंड आणि भारत सगळ्यात प्रबळ दावेदार आहेत. निवड समितीनं योग्य निर्णय घेतला तर ऑस्ट्रेलिया १०० टक्के वर्ल्ड कप जिंकू शकते', असं ट्विट शेन वॉर्ननं केलं.

२०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला होता. सर्वाधिक क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याचं रेकॉर्डही ऑस्ट्रेलियाच्याच नावावर आहे. ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत ५ वर्ल्ड कप जिंकले आहेत. पण २०१८ साली ऑस्ट्रेलियाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पण दिग्गज बॅट्समन डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ हे वर्षभराच्या बंदीनंतर पुनरागमन करणार असल्यामुळे ऑस्ट्रेलियाची ताकद नक्कीच वाढेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची कामगिरी

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय टीमची कामगिरीही उल्लेखनीय झाली आहे. १८ जूनला पाकिस्तानविरुद्धची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल गमावल्यानंतर भारतानं ९ वनडे सीरिज जिंकल्या आहेत. विराटच्या नेतृत्वात भारतानं २०१९ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्यांच्याच मायभूमीत पराभूत केलं. तर २०१८ साली भारतानं दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिजमध्ये ५-१नं विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतानं फक्त एकच वनडे सीरिज गमावली आहे. २०१८ साली इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला होता.