जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २८९ रन्स केल्या आहेत. शिखर धवननं या मॅचमध्ये शतक झळकावलं तर कॅप्टन विराट कोहलीनं अर्धशतक केलं. धवन आणि कोहलीची विकेट गेल्यावर भारतीय बॅट्समनची पडझड पाहायला मिळाली. अखेर धोनीनं भारताचा डाव सावरायला मदत केली.
शिखर धवनचं वनडे क्रिकेटमधलं हे १३वं शतक आहे. मुख्य म्हणजे शिखर धवननं त्याच्या १००व्या वनडेमध्ये हे शतक ठोकलं आहे. शिखर धवन १०५ बॉल्समध्ये १०९ रन्स करून आऊट झाला. धवनच्या या खेळीमध्ये ११ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहली ८३ बॉल्समध्ये ७५ रन्स करून आऊट झाला. विराटनं ७ फोर आणि १ सिक्स मारली. तर धोनीनं ४३ बॉल्समध्ये ४२ रन्स केल्या, यामध्ये ३ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. विराट कोहलीनं याआधी सीरिजमध्ये दोन शतकं झळकावली आहेत. तर शिखरनं या शतकाआधी या सीरिजमध्ये अर्धशतकही केलं होतं.
६ वनडेच्या या सीरिजमध्ये भारत ३-०नं आघाडीवर आहे. ही मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्याची संधी आता भारतीय बॉलर्सपुढे असणार आहे. भारताचे स्पिनर्स युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या तीन मॅचमध्ये ३० पैकी २१ विकेट या दोघांनी घेतल्या आहेत. तर विराट कोहलीनंही मागच्या मॅचमध्ये १६० रन्सची खेळी केली होती.
बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन वनेडला मुकलेल्या एबी डिव्हिलियर्सनं या मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. फॅप डुप्लेसिस आणि क्विंटन डीकॉक मात्र अजूनही टीममध्ये नाहीत.