लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series) यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघांनी या मालिकेसाठी कंबर कसली आहे. इंग्लंड आपल्या घरात खेळत असल्याने त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर टीम इंडियाला प्रतिकूल स्थितीशी तडजोड करत खेळावे लागणार आहे. त्यामुळे डरहममध्ये काउंटी इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळत आहेत. हा सराव सामना टीम इंडियासाठी मदतशीर कमी तर डोकेदुखी जास्त ठरत आहेत. या सराव सामन्यादरम्यान 2 दिवसात टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. परिणामी त्यांना या मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. (india vs england test series 2021 all-rounder washington sundar likely be out of test serise due to injury)
कोण आहेत ते खेळाडू?
टीम इंडियाला प्रॅक्टीस मॅचदरम्यान दोन दिवसात 2 धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज आवेश खाननंतर (Avesh Khan) आता स्पिन ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरलाही (Washington Sundar) दुखापत झाली आहे. त्यामुळे सुंदरलाही या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. दरम्यान याबाबत बीसीसीआयने (BCCI) याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
आवेशला 20 जुलैला सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी अंगठ्याला दुखापत झाली. तर दुसऱ्या दिवशी सुंदरच्या अंगठीला दुखापत झाली. हे दोघेही काउंटी इलेव्हनकडून खेळत होते. पण दुखापतीमुळे या दोघांसाठी दौऱ्याचा शेवट झाला आहे. दरम्यान याआधी सलामीवीर शुबमन गिललाही (Shubaman Gill) दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावे लागले. शुबमन दुखापतीनंतर भारतात पोहचला आहे.
दरम्यान बीसीसीआयने आतापर्यंत शुबमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर मालिकेतून बाहेर झाल्याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही.