मुंबई : इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसतोय. याचा फटका इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला देखील बसलेला दिसला. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तो आयसोलेटही होता. मात्र आता कोरोना चाचणीनंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
पंतच्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर आता पंत लवकरच प्रॅक्सिससाठी परतणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येतेय.
8 जुलै रोजी ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती. यावेळी त्याला कोणतीही लक्षणं जाणवत नव्हती. खबरदारी म्हणून पंत आयसोटेल झाला होता. पंतचे नातेवाईक इंग्लंडमध्ये राहतात त्यांच्याच घरी तो आयसोलेट झाल्याची माहिती आहे. रविवारी त्याचा आयसोलेशनचा काळ संपला असून आता त्याची कोरोना चाचणी देखील निगेटीव्ह आली आहे.
InsideSport.co या वेबसाईटने दिलेल्या माहितीप्रमाणे, पंत 22 जुलैपासून टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. त्यामुळे आता दुसऱ्या सराव सामन्यात पंत मैदानात उतरणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
पंतला नेमका संसर्ग कसा झाला याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान युरो कपचा फुटबॉल सामना पाहायला गेला असताना तिथे मास्क न घातल्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. तिथेच कोरोना झाला असावा अशी चर्चा देखील होती. मात्र त्यानंतर तो दातांच्या डॉक्टरकडे गेला असताना हा संसर्ग झाल्याचं सांगितलं जात होतं.