मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रनचा मोठा स्कोअर केल्यानंतरही भारताचा पराभव झाला. यामुळे ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं २-२नं पुनरागमन केलं हे. या पराभवानंतर विराट कोहलीनं शेवटच्या काही ओव्हरमध्ये संधी गमावल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शेवटच्या काही ओव्हरमध्ये आम्ही पाच संधी गमावल्या. कोणत्याही चांगल्या टीमसाठी या गोष्टी पचवणं कठीण असतं, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली.
मॅच संपल्यानंतर कोहली म्हणाला, 'खेळपट्टी पूर्णवेळ चांगली होती, पण मागच्या दोन्ही मॅचमध्ये धुक्यामुळे आमची अडचण झाली. पण हे कारण असू शकत नाही. शेवटच्या काही ओव्हरमध्ये आम्ही ५ संधी गमावल्या. स्टम्पिंगची संधी महत्त्वाची असते. डीआरएसचा निर्णयही हैराण करणारा होता. यामध्ये अजिबात सातत्य नव्हतं. यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. आम्हाला सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल. ऑस्ट्रेलियाची टीम आमच्यापेक्षा चांगली खेळली, याचा स्वीकार करावा लागेल.'
'एश्टन टर्नर आणि पिटर हॅण्ड्सकॉम्बनं चांगला खेळ केला. तर उस्मान ख्वाजानं ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला', असं म्हणत कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगचं कौतुक केलं. शेवटच्या काही ओव्हरमध्ये भारतीय फिल्डरनी खराब फिल्डिंग केली. शिखर धवन आणि केदार जाधवनं सोपा कॅच सोडला, तर ऋषभ पंतनं स्टम्पिंगची संधी सोडली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेवेळी डीआरएसमुळेही वाद निर्माण झाला. भारतानं ठेवलेल्या ३५९ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ३९ बॉलमध्ये ६६ रनची गरज होती. यावेळी युझवेंद्र चहलच्या बॉलिंगवर एश्टन टर्नरच्या बॅटला लागलेला बॉल विकेट कीपर ऋषभ पंतनं पकडला, पण अंपायरने नॉट आऊट दिल्यामुळे ऋषभ पंतनं डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्निकोमध्येही बॉल बॅटच्या बाजूने जात असताना आवाज आल्याचं दिसत होतं. तरीही टर्नरला नॉट आऊट देण्यात आलं.
डीआरएसच्या या वादानंतर कोहलीनं उघड नाराजी व्यक्त केली. एश्टन टर्नरनं ४३ बॉलमध्ये नाबाद ८३ रनची आक्रमक खेळी केली. टर्नरच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं ३५९ रनचं आव्हान ४७.५ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. याआधी ऑस्ट्रेलियाला एवढ्या रनचा पाठलाग करताना कधीच विजय मिळाला नव्हता.