नवी दिल्ली : युवराज सिंग, क्रिस गेल आणि अफगाणिस्तानचा मिस्ट्री स्पिनरला ४ कोटी रुपयांत खरेदी करत किंग्स इलेव्हन पंजाबने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
पंजाबच्या टीमने लिलावात मोठी आणि कमी किंमत लावत सर्वांनाच धक्का दिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबच्या टीमने एकूण २१ खेळाडूंवर बोली लावली.
किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीमने लावलेली बोली पाहता यावेळी नव्या रुपात मैदानात उतरणार असल्याचं दिसत आहे. इतकचं नाही तर, पंजाबची टीम यंदाच्या आयपीएलमध्ये एका नव्या नावासह उतरणार असल्याचं दिसत आहे.
गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल सीजनमध्ये खराब प्रदर्शनानंतर यंदाच्या वर्षी पंजाबची टीमचं नाव बदलुन खेळताना दिसण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, प्रीती झिंटाची टीम किंग्स इलेव्हन पंजाब यंदा आपलं नाव बदलण्याचा विचार करत आहे. त्यासाठी पंजाबच्या टीमने बीसीसीआयकडे मागणीही केली आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पंजाबच्या टीमने बीसीसीआयला युएसमधील इतर खेळांचं उदाहरण दिलं आहे. यामध्ये अनेक टीम्सने आपल्या नावांत बदल करत मैदानात पुनरागमन केल्याचं म्हटलं आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, पंजाबच्या टीमने आयपीएलसाठी आपल्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे.
जर असं झालं तर, किंग्स इलेव्हन पंजाबची टीम आयपीएलच्या इतिहासात आपलं नाव बदलणारी पहिली टीम बनेल. गेल्या सीजनमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्सच्या टीमने आपलं नाव बदलत रायजिंग पुणे सुपरजायंट असं केलं होतं. मात्र, त्यांनी आपल्या नावातून केवळ इंग्रजी शब्द 's' हटवला होता. पण पंजाबची टीम आपलं संपूर्ण नाव बदलण्याचा विचार करत आहे.