दुबई : इंडियन प्रीमियर लीग मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबसाठी अद्याप हा हंगाम चांगला ठरलेला नाही. पाचपैकी एक सामना जिंकणाऱ्या या संघाला आज विजयाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर हैदराबादलाही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात विजय मिळवायचा आहे, कारण त्यांनाही शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
पंजाबबद्दल बोलायचे झाले तर त्याची समस्या प्रामुख्याने फलंदाजीची आहे. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवालखेरीज आणखी धावा करणारा दुसरा फलंदाज नाही. आतापर्यंत लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही हे दोघे पहिल्या पाचमध्ये आहेत, पण या दोननंतर संघाची जबाबदारी स्वीकारणारा दुसरा फलंदाज नाही. करुण नायर, मनदीप सिंग, सरफराज खान, निक्लोस पूरन, ग्लेन मॅक्सवेल यांनी अद्याप कोणत्याही संघासाठी मोठी खेळी खेळलेली नाही.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात, पूरनने शेवटी शेवटी वेगवान धावा केल्या, परंतु संघाला त्याच्याकडून आणि ग्लेन मॅक्सवेलकडून सातत्याने चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. जेणेकरुन ते या स्पर्धेत टीकू शकतील.
गोलंदाजीतही मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत, परंतु इतर गोलंदाजांकडून त्यांना पाठिंबा मिळत नाहीये.
दुसकीकडे हैदराबादपुढे देखील अनेक अडचणी आहेत. त्याचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. शेवटचा सामनाही तो खेळला नाही. फलंदाजीमध्ये जॉनी बेअरस्टो, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि मनीष पांडेशिवाय इतर कोणीही चांगला खेळ करु शकलेला नाही. या चार फलंदाजानंतर हैदराबादकडे दुसरे कोणीच नाही.
गोलंदाजीत सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा यांना शेवटच्या सामन्यात संधी मिळाली पण दोघांनाही काही खास कामगिरी करता आली नाही. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत संघ त्याची भरपाई कशी करेल हे एक मोठं आव्हान आहे. राशिद खानवरील जबाबदारी वाढली आहे. उर्वरित खेळाडूंकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा बाळगून हैदराबादला स्पर्धेत टिकण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.