मुंबई: एकीकडे आयपीएलचे सामने सुरू होते तर दुसरीकडे देशात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती ओढवली होती. या कोरोनाच्या विळख्यात काही खेळाडूंचे कुटुंब देखील सापडले होते. दिल्ली कॅपिटल्स संघातील ज्येष्ठ स्पिनर आर अश्विन हा त्यामधील एक होता. ज्याच्या कुटुंबाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
आर अश्विननं IPLमधून ब्रेक घेतला आणि तो आपल्या कुटुंबासाठी घरी परतला होता. अशा कठीण काळात त्याला कुटुंबासोबत राहायचं होतं मात्र ही माहिती मिळाल्यापासून घरी पोहोचेपर्यंत त्याच्या मनाची होणारी घालमेल आणि आलेलं टेन्शन याबाबत आर अश्विननं खुलासा केला आहे.
अश्विननं सांगितलं की माझ्या कुटुंबातील सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पत्नीने ही बातमी मला थोडी उशिराच दिली. त्यांच्या सुरक्षेबाबात सतत चिंता वाटत होती आणि अशाच मनस्थितीत मी मैदानात खेळण्यासाठी उतरत होतो. कुटुंबात कोरोना शिरला ही बातमी कळल्यानंतर मला कित्येक रात्री झोपच लागली नाही. माझी झोप उडाली आणि सतत भीती, चिंता टेन्शन वाटत होतं. दुसऱ्या दिवशी तशाच परिस्थितीत मैदानात खेळण्यासाठी उतरायचो.
झोप पुरी न करताच सामने खेळायचे आणि त्यामध्ये कुटुंबाचं टेन्शन यामुळे मला हळूहळू खेळणं कठीण होऊ लागलं. त्यामुळे IPLमधून ब्रेक घेऊन कुटुंबियांसोबत जाण्याचा निर्णय मी घेतला.
इंग्लंड दौर्यावर जाण्यापूर्वी अश्विन सध्या टीम इंडियाच्या उर्वरित साथीदारांसह मुंबईत आहे. अश्विनसह बहुतेक भारतीय खेळाडू 19 मेपासून मुंबईत क्वारंटाईनमध्ये आहेत आणि ते 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईपर्यंत तिथेच राहतील. भारतीय संघ इंग्लंड दौर्यावर आयसीसी विश्वचषक चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.